Workshop @ Panasonic & Weld Tech Corporation Pune | One week SDP Workshop- SVERI, Pandharpur | Workshop on Seven Habits- D.Y. Patil, Pune | Motivational Speech- SPM Solapur


5WH- अचूक निर्णयाचा फॉर्म्युला

5Wh

          काल व्याख्यानाच्या निमित्तानं एका इंजिनियरिंग कॉलेज मध्ये गेलो होतो, 'सर ओळखलं का मला?' मी तुमचा विद्यार्थी. तुम्ही सांगितलेला फॉर्म्युला मला आजही लक्षात आहे. त्यामुळे खूप फायदा होतो !' एक उंच, गोरा थोडासा लाजाळू मुलगा माझ्याशी बोलत होता. अरे तू विक्रम पाटील, सिव्हिल चा तू विद्यार्थी. त्याच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं. 'कसा आहेस तू ?' काय चाललंय तुझं? आज मी गडबडीत आहे. माझी एक महत्वाची मीटिंग आहे असे सांगत मी गाडीत बसलो. मिटिंगच्या ठिकाणी पोहोचायला 35-40 मिनिट लागणार होती. मी फ्लॅशबॅक मध्ये गेलो.

          स्वामी विवेकानंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ह्या कॉलेज चा प्राचार्य म्हणून मी 5-5 1/2 वर्षे प्रभावीपणे काम केलं. त्याच गमक होतं विद्यार्थ्यांशी सतत केलेला सुसंवाद. प्राचार्यांनी प्रत्येक मुलापर्यंत पोहोचलं पाहिजे हे माझं सूत्र होतं. माझ्या नेहमीच्या राउंड, लेक्चर्स व्यतिरिक्त मी प्रत्येक सोमवारी Commom Address ही संकल्पना सुरू केली. 1 तासाचा कार्यक्रम अतिशय प्रभावी व मोटिव्हेशनल तयार केला होता. गेल्या आठवड्यात ज्यांनी ज्यांनी चांगलं काम केलं आहे, ज्याची उपस्थिती 100 टक्के आहे, स्टार ऑफ द वीक, सजेशन बॉक्स मधून आलेल्या प्रत्येक प्रश्नास उत्तर व कार्यवाही अशा अनेक कल्पनां सोबत प्रत्येक कार्यक्रमात मुलांना मी तीन इंग्रजीतील शब्द विचारायचो. पहिल्या आठवड्यात सुरुवात A शब्दापासून केली, मुलांकडून शब्द यायचे Attitude, Aptitude, Assertivness, Altitude, Affection.. मग त्यातील तीन शब्द निवडून त्याचा आपले व्यक्तिमत्व घडविण्यासाठी कसा उपयोग करायचा ह्यावर मी 15 मिनिटे मार्गदर्शन करायचो.

          खूप इंटरेस्टिंग व्हायचं ते सेशन. मुलांमध्ये गोडी निर्माण होत होती. सर्व मुले हा कार्यक्रम आवर्जून अटेंड करायची. असं A, B, C, D..... करत गाडी आता आली होती W अक्षरापासून व्यक्तिमत्व विकासासाठी उपयुक्त तीन शब्द सांगायचे. कुणीच उत्तर देईना ! बळे बळेच पुढच्या रांगेत बसलेल्या विक्रम पाटील ला मी उठवलं. नाही सर माहीत नाही सर म्हणत तो तोंड चुकवीत होता, शेवटी विद्यार्थ्यांनी त्याला स्टेजवर ढकललं. घाबरत तो म्हणाला मला 3-4 शब्द माहीत आहेत.. What, Why, When and Where...

          तोच धागा पकडून मी म्हणालो हे शब्द तर फारच महत्वाचे आहेत. अरे अख्खे मॅनेजमेंट, इंडस्ट्रीयल इंजिनियरिंग अशा विषयांचा गाभा म्हणजे हे शब्द आहेत. '5WH' हे फार महत्वाच तंत्र आहे. आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी तर ही पर्वणी आहे. Very Good. Give him a big applause. आज त्याला एका ऐवजी दोन चॉकलेट देत ह्या तंत्रविषयी बोललो. सर्व विद्यार्थी, स्टाफ माना डोलवीत होते.

          म्हटलं आज आपण '5WH' विषयी लिहू. प्रस्तावना मुद्द्यांमुनच थोडी विस्तारानं लिहिली. जेणेकरून ह्या तंत्राच गांभीर्य, व्याप्ती लक्षात यावी. W पासून सुरू होणारे 5 शब्द What, Why, Where, Whom, When आणि H पासून सुरू होणार शब्द How ? असे हे 5WH हे तंत्र, फॉर्म्युला आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिगत जीवनात, कुठल्याही ऑरगनायझेशनसाठी अत्यंत उपयोगी, प्रभावी आहे..

          आज आपल्याला आयुष्यात अनेकदा महत्वाचे निर्णय घ्यावे लागतात, बऱ्याच वेळा विचार न करता निर्णय घेतले जातात, घाई गडबडीत निर्णय घेतले जातात. बहुतेक वेळा आपले निर्णय चुकतात, आपले नुकसान होते, पश्चाताप होतो. मानसिक त्रास होतो. हे चक्र नवीन नाही आहे. या चक्रातून कोणीही सुटला नाही. अगदी छोट्या गोष्टींपासून ते करियर ची दिशा ठरविण्यापर्यंत लहान, मोठे, अतिशय महत्वाचे निर्णय आपल्याला घ्यावे लागतात. अगदी कोणता मोबाइल घेऊ ? कोणता TV घेऊ ? कुठला क्लास लावू ? कोणता कोर्स करू ? कोणती नोकरी करू ? माझा परफॉर्मन्स कसा वाढवू ? माझा लाईफ पार्टनर कसा निवडू ? उद्योजक असेल तर कुठला प्रॉडक्ट निवडू ? कोणत्या शहरात बिझिनेस करू ? डॉक्टर असेल तर कुठले स्पेशलायझेशन करू ? कुठे हॉस्पिटल टाकू ? नट असेल तर कुठला रोल मी करू ? कुठला सिनेमा मी करु ?...

असे अनंत प्रश्न आणि त्या अनुषंगाने घेतलेले निर्णय.

आपले निर्णय अचूक(Most of the Time) घ्यायचे असतील तर '5WH' तंत्राचा वापर व्हायलाच हवा, ह्या 6 शब्दांवर, प्रश्नांवर सिरीयस थाट पाहीजेलच !



1 'what’ is to be done? आपल्याला 'काय’ करायचे आहे ?

          बऱ्याच वेळेला काय करायचे आहे हे नक्की कळत नाही. उगाचच दुसऱ्या कोणाचे तरी ऐकून, अपुरी माहिती घेऊन निर्णय घेतले जातात व ते चुकीचे सिद्ध होतात. त्यापुढे आपल्याला नक्की काय करायचे आहे, आपला इंटरेस्ट कशात आहे, किंवा कधी कधी जॉबचा भाग म्हणून, कर्तव्य म्हणून हे आपल्याला करायचे आहे, याचा शोध घेणे महत्वाचे. 'काय करायचे' ह्या विषयी माहिती मिळविण्यासाठी अनेक Resources उपलब्ध आहेत. जसे google, वृत्तपत्रे, मासिके, TV, channels, social media, आपल्या सहवासात असलेल्या व्यक्ती, फॅमिली मेंबर्स, आपले शिक्षक, मित्र असे अनेक resources आहेत. त्यांचा चांगल्या रीतीने उपयोग करा, त्यासाठी शिस्त बद्ध आराखडा करा, पुरेशी माहिती संकलीत करा. इतरांशी चर्चा करा. 1-2 पर्याय तयार ठेवा मग पुढील पायरीसाठी जा. उदा. 12 वी नंतर मला कोणत्या कोर्सला जायचं आहे.. मोटर सायकल घ्यायची की स्कुटर घ्यायची.. इ...



2 'why’ it is done ? आपल्याला हेचं 'का' करायचे आहे ?

          ह्या पायरी मध्ये जे आपण पर्याय निवडलेले आहेत, त्यातील सर्वोत्तम पर्याय निवडायला मदत होते. जे option पहिल्या पायरीमध्ये आपल्या डोळ्यासमोर आहेत त्याची सविस्तर कारणे लिहिणे गरजेचे आहे ! का ? याची मनापासून आलेली उत्तरे अशी असू शकतात. जसे मला इंजिनियरिंग ला ऍडमिशन घ्यायची आहे. का ?
A) मला सुरवातीपासूनच Basic Science, Maths मध्ये इंटरेस्ट आहे.
B) दैनंदिन अडचणी वर मात करण्यासाठी ह्या विषयाची तत्वे कशी उपयोगी पडतात याबद्दल मला आकर्षण आहे.
C) माझ्या डोळ्यासमोर इंजिनीयर ..... हे आदर्श आहेत.
D) मी CET/JEE परीक्षा चांगल्या मार्कानी उत्तीर्ण झालो आहे.
E) शासनाकडून मला शैक्षणिक स्कॉलरशिप मिळते आहे, माझ्या फॅमिलीवर विशेष आर्थिक बोजा पडणार नाही.
F) इंजिनियरिंग क्षेत्रात अमर्याद संधी आहेत. त्यांची माहिती मी घेतली आहे.
G) चार वर्षाच्या कोर्सनंतर मी चांगले अर्थार्जन करू शकेन व माझ्या फॅमिलीच्या गरजा पूर्ण करू शकेन हा माझा विश्वास आहे.
H) ग्रुप मध्ये काम करणे, नवीन गोष्टी शिकणे. ह्या गोष्टी मला उपयोगी पडणार आहेत.
I) मी इंजिनियरिंग ग्रॅज्युएट होऊन बेकार राहण्याची शक्यता जवळपास शून्य टक्के आहे.
इ.इ...
आपल्याला लक्षात आले असेल की एवढ्या सखोल पणे आत्मचिंतन करून ' का ' ची उत्तरे आपला निर्णय पक्का करतात. अशा रीतीने विविध पर्यायांबद्दल चिंतन करावे व त्यातून एक पर्याय अंतिम निवडावा...



3 'when' it is done ? हे नक्की 'कधी' करायचे आहे ?

          जसजसे आपण एकेक पायरी वर चढू तस तसे आपल्या निर्णयाविषयी अधिकाधिक बळकटी येत जाईल.
'योग्य वेळी योग्य कृती' हे ब्रीदवाक्य लक्षात ठेवा, कधी म्हणजे Time Factor अत्यंत महत्वाचा आहे, निर्णय हा Time bound नसेल तर त्याला काही अर्थच राहणार नाही, एकदा ती dead line ठरल्यानंतर आपल्याला व्यवस्थित प्लांनिंग करता येईल बऱ्याच वेळा काही गोष्टी खूपच urgent असतात, लगेचच निर्णय घ्यावे लागतात, जसे आपली तब्येत बिघडली असेल तर त्यावर तात्काळ उपाय करणे आवश्यक आहे, जसे सध्याचा Pandemic च्या काळात कोणाला ताप आला असेल, खोकला आला असेल तर ताबडतोब डॉक्टरकडे जाणे भाग आहे नाहीतर काय होईल ह्याची कल्पना आपल्याला धडकी भरवते ! अगदीपुढे पुढे जाऊन covid-19 वर प्रतिबंधक लस बनविणे आपल्या देशाची priority बनते. बाकी urgency नसेल तर आपल्याकडे planning करायला पुरेसा वेळ असतो, शैक्षणिक बाबतीत निर्णय असेल तर जून जुलै पासून सुरू होणारे शैक्षणिक वर्ष हे महत्वाचे आहे. आपण जर उत्पादक असाल तर आपल्या प्रॉडक्ट नुसार ऋतू महत्वाचे असतात जसे छत्री बनविण्याचा कारखाना असेल तर उत्पादन मे पर्यंत(पावसाळ्याधी) तयार पाहिजे, कुलर हा जर प्रॉडक्ट असेल तर उत्पादन जानेवारी मध्ये तयार पाहिजे... कधी कधी आपले planning 1 वर्ष, 3 वर्षाचे असू शकते. जसे घर बांधणे, Tour बुक करणे इ... अशी अनेक उदाहरणे देता येतील. तात्पर्य वेळेचे बंधन असल्याशिवाय तो निर्णय अचूक होऊ शकत नाही.



4. 'where' it is to done ? 'नक्की' कुठे करायचं आहे ?

          आपण ठरविलेल्या गोष्टी 'कोठे' करायचे ह्या नुसार आपल्या अनेक गोष्टी बदलतात. जसे Lockdown मध्ये लग्न करायचे तर मर्यादित लोकांसमोर लग्न घरी करता येते. भव्य मोठ्या प्रमाणात करायचे म्हणल्यास वाट पहावी लागणार, मोठे कार्यालय बुक करावे लागणार, अगदी विराट कोहली सारखे इटली डेस्टिनेशन वर लग्न करायचे असेल तर तयारीचे सर्व चित्र पालटते, त्याहून कहर म्हणजे आता लोक चंद्रावर लग्न करण्याचा तयारीला लागले आहेत ! त्यामुळे place, ठिकाण ह्या वर सुद्धा विचार होणे अत्यावश्यक आहे. आणखीन उदाहरण द्यायची झाल्यास कोणत्या कॉलेज ला ऍडमिशन घायचे आहे ? आपल्याला नोकरी कुठल्या शहरात करायची आहे ? आपल्याला फॅक्टरी, दुकान कोणत्या भागात काढायचे आहे, आपल्या मुलाला कोणत्या शाळेत घालायचे ह्याबाबतीत घरा 'जवळील' शाळा हा पर्याय अनेक वेळा सुयोग्य ठरतो. इ.इ.



5. By 'whom' it is to be done ? नक्की हे काम 'कोणा करवी' करायचे आहे?

          ह्या फॉर्म्युला मधला पाचवा W सर्वात महत्वाचा. आपले कुठलेही काम असो ते कोणामार्फत किंवा कुणाकडून करायचे ही गोष्ट तेवढीच महत्वाची. अगदीच आवाक्यातील छोटे काम असल्यास स्वतः केलेले उत्तम. प्रत्येक व्यक्तीकडे विशिष्ठ प्रकारचे ज्ञान, टॅलेंट असते, कसब असते. याचा चांगल्या रीतीने उपयोग करायला हवा. मोठी, महत्वाची कामे ह्यांच्याशिवाय पूर्ण होणं अवघड आहे. कॉर्पोरेट industries मध्ये collaborative skills ला अनन्यसाधारण महत्व आहे. ज्या व्यक्तीचे आपण सहकार्य घेणार आहोत त्या व्यक्तीची इत्यंभूत माहिती आपल्याला हवी जसे, शिक्षण, अनुभव, past रेकॉर्ड, success ratio, स्वभाव इ. इ. जसे आपल्या हृदयाची open Heart surgery करायची आहे. त्यासाठी योग्य डॉक्टरच कामास येणार आहे. त्याच्यावर एकदा काम सोपविल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवायला पाहिजे. व्यक्ती निवडताना, मग ती कोणीही असो जसे, गाईड, शिक्षक, डॉक्टर, मॅन्युफॅक्चरर, ड्राइवर, सप्लायर इ. इ. त्याची योग्य निवड होणे महत्त्वाचे आहे. जेंव्हा team work असते तेंव्हा Team चा प्रत्येक सदस्याला आखून दिलेला रोल तो करेल की नाही याबद्दल खात्री करणे अत्यंत गरजेचे. मग तुम्ही प्रोजेक्ट मॅनेजर असाल, क्रिकेट टीम असू देत, एखाद्या चित्रपटाची निर्मिती असू देत आशा Team Work Project मध्ये हा पाचवा W 'by whom' हा अत्यंत महत्वाचा.



6. 'H'- How it is to be done ? हे कार्य कोणत्या पद्धतीने, कसे करायचे ?

          5WH मधील हा शेवटचा आणि अंतिम टप्पा. जेणेकरून तुम्ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करायला तुम्ही मोकळे. HOW चा अर्थ हा पद्धती(Method/System) ह्या करिता वापरला जातो. आता सध्याच्या Covid-19 च्या काळात वैयक्तिक बोलावून एखादे काम करण्यापेक्षा जिथे शक्य आहे, जेवढे शक्य आहे, त्याकरिता online, Internet चा वापर सर्वोत्तम पर्याय ठरला आहे. अगदी डिसेंम्बर 2019 पर्यंत ह्या online पद्धतीचा वापर अगदीच नगण्य होता ! त्यामुळे योग्य कामासाठी योग्य पद्धत ही अत्यंत महत्वाची. बऱ्याचदा एखादे काम अनेक प्रकारे करता येऊ शकते आशा वेळ, Most economical method, systematic अँड simple method वापरण्याकडे आपला कयास असावा. काही औद्योगिक कामामध्ये ती पद्धत safe आहे का ह्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जाते. विशेष करुन जीवीत हानी होऊ नये ह्याला प्राधान्य दिले जाते.
द्यायलाच पाहिजे..



          काही व्यक्तींच्या बाबतीत Ethical Method ला जीवनात सर्वोच्च स्थान आहे. पैसे देऊन काम करुन घेणे ह्याला सुद्धा आळा बसला पाहिजे. मित्रांनो असे अनेक पर्याय आपल्या समोर असतात. 'Right method for the right job' ह्याप्रमाणे निर्णय घेण्याला महत्व द्यावे.

म्हणूनच 5WH हा अचूक निर्णयाचा फॉर्म्युला किंवा तंत्र आहे हे म्हणतात ते उगीच नाही.
आपल्या जीवनात आपण घेतलेल्या निर्णयाला सर्वोच्च स्थान आहे. म्हणून थोडेसे विस्ताराने लिहिले आहे. जाता जाता काही थोर, यशस्वी व्यक्तींनी फार कल्पक, मार्मिक, विवेचन केले आहे. आपणही त्याचा जरूर वापर करावा, आचरणात आणावा.

डिसीजन घेण्या बाबत खालील तीन वाक्ये कायम लक्षात ठेवा.

  • आपण उदास असताना, रागात असताना, दुःखी असताना, खूप आनंदी असताना महत्वाचे निर्णय घेऊ नका.

  • Making a decision takes a moment, living a decision takes a life time. निर्णय घेताना एखादा क्षण पुरेसा असतो पण त्याचे परिणाम चांगले किंवा वाईट आयुष्यभर असतात.

  • I am not a product of my circumstances. I am a product of my decisions. माझ्या भोवतालच्या परिस्थितीपुढे मी घडलो नाही तर मी घेतलेल्या निर्णयापुढे मी घडलो आहे !




Er.Mohan Deshpande

Founder Director & Chief Trainer

ACE Soft Skill Solutions





















Copyright 2019 Ace Soft Skill Solutions.
Designed & Developed By Mindborn Software Solutions